गडहिंग्लजमध्ये उद्यापासून यूथ चॅम्पियनशिप फुटबॉल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 May 2019

एक नजर

  • गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि महागावच्या संत गजानन महाराज शिक्षण समूहातर्फे गुरुवार (ता. ९)पासून यूथ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा. 
  • १३, १५ आणि १८ वर्षांखालील स्पर्धेसाठी रोख एक लाख रुपयांची पारितोषिके.
  • एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र, हरियाना, केरळ, कर्नाटकसह ३६ संघांचा सहभाग. 
  • एसजीएम युनायटेड करंडक स्पर्धेचे यंदाचे हे दुसरे वर्ष. 

गडहिंग्लज - येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि महागावच्या संत गजानन महाराज शिक्षण समूहातर्फे गुरुवार (ता. ९)पासून यूथ चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. १३, १५ आणि १८ वर्षांखालील स्पर्धेसाठी रोख एक लाख रुपयांची पारितोषिके आहेत. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्र, हरियाना, केरळ, कर्नाटकसह ३६ संघांचा सहभाग आहे. एसजीएम युनायटेड करंडक स्पर्धेचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे.

युवा फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा होत आहे. पहिल्या दोन दिवशी १३ वर्षे वयोगटातील स्पर्धा होतील. गुरुवारी सायंकाळी चार वाजता संत गजानन शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. अण्णासाहेब चव्हाण यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन होईल. संतोष ट्रॉफी माजी राष्ट्रीय खेळाडू विश्वास कांबळे हे प्रमुख पाहुणे तर माजी फुटबॉल खेळाडू  डॉ. सुरेश संकेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील, प्रा. अनिता चौगुले, पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, महादेव तराळ, बसवप्रभू लोणी, राजेंद्र पाटणे, अमर नेवडे हे उपस्थित राहणार आहेत.

पहिल्या दिवशी साखळी पद्धतीने चार गटात सामने होतील. प्रत्येक गटातील विजेता संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. दुसऱ्या दिवशी सकाळी उपांत्य फेरीचे, तर सायंकाळी अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेतील सहभागी संघ यांची निवास आणि भोजनाची व्यवस्था संयोजकांनी केली आहे.

प्रत्येक सामन्यातील विजयी संघातील उत्कृष्ट खेळाडू सामनावीर, तर पराभूत संघातील चांगल्या खेळाडूस लढवय्या म्हणून गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेची फुटबॉल क्षेत्रात उत्कंठा लागून राहिली आहे. स्पर्धेसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. फुटबॉल शौकिनांनी मोठ्या संख्येने सामने पाहण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष संभाजी शिवारे, उपाध्यक्ष अरविंद बारदेस्कर, एसजीएमचे डॉ. संजय चव्हाण, डॉ. यशवंत चव्हाण यांनी केले आहे.


​ ​

संबंधित बातम्या